चिपळूण नगर परिषद 
रत्नागिरी

Ratnagiri News| चिपळूण न. प.च्या इमारतीला मिळणार कॉर्पोरेट लूक

भूकंप आणि पुरापासून मिळणार संरक्षण; अद्ययावत सोयीसुविधांनी साकारणार प्रशासकीय इमारत

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार्‍या चिपळूण नगर परिषदेची जुनी इमारत पाडली जाणार आहे. नव्या इमारतीसाठी भूमिपूजन झाले असून ‘शेंगदाणा’ बिल्डिंग लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षांत चिपळूण न.प.ची अद्ययावत इमारत उभी राहणार आहे. आधुनिक जगाशी मिळती-जुळती आणि कॉर्पोरेट लूक असणारी ही इमारत चिपळूणच्या वैभवात भर घालणार असून आगामी सुमारे ५० ते ७० वर्षे भविष्यात याच प्रशासकीय इमारतीमधून चिपळूणचा कारभार सुरू होणार आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सर्व्हे क्रमांक ५,९०९ चिपळूण येथे प्रस्तावित करण्यात आले असून वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजना (सन २०२५-२६) अंतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आधुनिक वास्तुकला, नागरिकांसाठी सुलभ सेवा आणि नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण यांचा संगम साधून या भव्य इमारतीचे नियोजन करण्यात आले आहे. चिपळूण शहरातील वार्षिक पूरस्थितीचा गंभीर विचार करून इमारतीचा तळमजला पूर्णपणे मोकळा ठेवण्यात आला आहे. जेणेकरून पुराच्या पाण्यामुळे प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या ’टाईप प्लॅन’चा आधार घेऊन स्थानिक गरजेनुसार आवश्यक बदल करून या इमारतीचा आराखडा तयार केला आहे. ही इमारत तळमजला (स्टिल्ट) आणि त्यावर तीन मजले अशा स्वरूपाची असून भारतीय मानक संहितेनुसार भूकंपरोधक रचना करण्यात आली आहे. इमारतीचे दर्शनी रूप अत्यंत आकर्षक ठेवण्यात आले आहे. सर्व खोल्या व सभागृहांमध्ये पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि वायुविजन राहील, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. दिव्यांग नागरिक व अभ्यागतांच्या सोयीसाठी रॅम्प, लिफ्ट तसेच रुंद जिने आणि पॅसेज देण्यात आले असून स्वच्छतागृहे व पाणीपुरवठ्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.

इमारतीच्या तळमजल्यावर नियमांनुसार कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी प्रशस्त वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. येथे इनडोअर आणि आउटडोअर मिळून ३६ चारचाकी वाहने आणि ३९० दुचाकी वाहने उभी करण्याची क्षमता असून गरजेनुसार आणखी वाहनेही उभी राहू शकतात. तळमजल्यावर भव्य प्रवेश लॉबी, विद्युत नियंत्रण कक्ष, दोन जिने आणि १० प्रवासी क्षमतेच्या दोन लिफ्ट्स देण्यात आल्या आहेत.

ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी स्ट्रेचर लिफ्टचाही समावेश आहे. पहिल्या मजल्यावर लोकप्रतिनिधी आणि थेट नागरिकांशी संबंधित विभागांची कार्यालये नियोजित आहेत. यामध्ये नगराध्यक्ष कार्यालय, उपनगराध्यक्ष कार्यालय आणि सात विषय समिती सभापतींची कार्यालये यांचा समावेश आहे. तसेच नागरिकांच्या कामांसाठी नागरी सुविधा केंद्र व कार्यालय विभाग, स्वच्छता विभाग, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, वाहन विभाग, अग्निशमन विभाग, दिव्यांग विभाग, भांडार व लिपिक विभाग आणि विद्युत अभियंता विभाग या कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.

दुसर्‍या मजल्यावर नगर परिषदेचे मुख्य प्रशासकीय आणि तांत्रिक विभाग कार्यान्वित राहतील. यामध्ये मुख्याधिकारी कार्यालय कर वसुली विभाग, लेखा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, नगररचना विभाग आणि विधी कार्यालय लिपिक यांचा समावेश आहे. याशिवाय या मजल्यावर जिने व लिफ्टसाठी ७०.०० चौ. मी., पॅसेजसाठी १७१.१५ चौ.मी. आणि स्वच्छतागृहांसाठी ३५.२४ चौ.मी. जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

तिसर्‍या मजल्यावरील सभागृहे आणि विशेष सुविधा

तिसर्‍या मजल्यावर नगर परिषदेच्या महत्त्वाच्या बैठका व सभांसाठी अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे. येथे ध्वनिनियंत्रण प्रणाली, अँटी-चेंबर आणि पॅन्ट्री सुविधांसह २९०.१७ चौ. मी. क्षेत्रफळाचे भव्य मुख्य सभागृह उभारण्यात येणार असून त्यामध्ये ६२ नगरसेवक आणि २० कर्मचार्‍यांची आसन क्षमता असेल. या सोबतच स्थायी समितीचे सभागृह, कर्मचारी भोजन कक्ष, अभिलेख कक्ष, भांडार कक्ष, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी तखझ लाऊंज आणि संगणक विभाग यांचा समावेश आहे. तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, स्वच्छतागृहे जिने व लिफ्ट आणि पॅसेज यांची सोय करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ३,९५६.९० चौ. मी. भूखंड क्षेत्रफळ उपलब्ध असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT