रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यात सुरू आहे. पहिल्या फेरीचे सर्वेक्षणानंतर एप्रिल ते जून दरम्यान दुसर्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचा प्रादेशिक विभागनिहाय निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दुसर्या सर्वेक्षणात मुंबई प्रदेशातून कोकण विभाग रत्नागिरी बसस्थानकाने पुन्हा बाजी मारली असून 100 पैकी 87 गुण प्राप्त करीत ‘अ’ मानांकन मिळवले आहे. त्याचबरेबर रत्नागिरी रहाटाघर, चिपळूण नवीन, खेड अशा चार बसस्थानकास ‘अ’ मानांकन तर पालीसह 11 बसस्थानकास ‘ब’ मानांकन माखजनसह 6 बसस्थानकास ‘क’ मानांकन मिळाले आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक आहे का हे पाहण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर राज्यभरातील एसटीच्या सर्व बसस्थानकावर स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू झाले आहे. पहिल्या सर्वेक्षणात ‘अ’ मानांकन मिळाले होते त्यानंतर एप्रिल ते जून महिन्यांत महामंडळाची एका कमिटीने रत्नागिरी बसस्थानकाची पाहणी केली. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महामंडळाच्या वतीने राज्यभरातील एसटी बसस्थानकाचे प्रादेशिक विभागनिहाय अ, ब, क वर्गवारीनुसार क्रमांक परिवहन महामंडळाने जाहीर केले आहे. मुंबई प्रदेशातून रत्नागिरी नवीन, जुन्या बसस्थानकाने व चिपळूण नवीन, खेड या बसस्थानकास ‘अ’ मानांकन प्राप्त झाले आहे. उर्वरित पाली, लांजासह 11 बसस्थानकास ब मानांकन तर गणपतीपुळे, माखजनसह 6 बसस्थानकास ‘क’ मानांकन जाहीर झाले आहे. दरम्यान, तिसर्या फेरीनंतर अंतिम मानांकन जाहीर करण्यात येणार आहे. या अभियानात 3 कोटींचे बक्षिस देण्यात येणार आहे. ‘अ’ मानांकन प्राप्त बसस्थानकास एक कोटीचे बक्षीस मिळणार आहे. शहरी ‘अ’ वर्ग, निमशहरी ‘ब’, ग्रामीण ‘क’ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केली आहे. ‘ब’ वर्गासाठी 50 लाख तर ‘क’ वर्गासाठी 25 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहरातील सुसज्ज अशा नवीन बसस्थानकास दुसर्या सर्वेक्षणात ‘अ ’ मानांकन मिळाले आहे. त्याचबरोबर रत्नागिरी रहाटाघर, खेड, चिपळूण बसस्थानकास ही अ मानांकन मिळाले. याचे श्रेय सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, एसटी प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्यांना जाते. या नंतर शेवटची फेरी होईल. त्या नंतर अंतिम मानांकन जाहीर होणार आहे.प्रज्ञेश बोरसे, विभागीय नियंत्रक, रत्नागिरी