चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील राधाकृष्णनगर येथील मुत्तपन मंदिराच्या स्वागत कमानीच्या ठिकाणी भरधाव वेगाने ट्रिपल सिट चाललेले तिघे दुचाकीस्वार चक्क एका नाल्यात कोसळले. चालकाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने तिघेजण नाल्यात पडले. त्यांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. त्यातील एकाला गंभीर दुखापत झाली असून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
ही घटना सोमवारी रात्री 9.15 वाजता घडली. शहरातील बहादूरशेख नाका ते डीबीजे महाविद्यालयाच्या दिशेने हे तिघे तरुण ॲक्टिव्हा दुचाकीने ट्रिपल सीट चालले होते. अशातच त्यांचा राधाकृष्णनगर येथील मुत्तपन मंदिराच्या कमानी जवळ येताच दुचाकीवरील ताबा सुटला. यामध्ये हे तिघेही दुचाकीसह नाल्यात कोसळले. या नाल्यातून नगरपरिषदेची पोलादी पाईपलाईन गेली असून त्यावर हे तिघेही आदळले. त्यामुळे एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तो तरुण जागीच बेशुद्ध पडला. तसेच अन्य दोघांनादेखील दुखापत झाली. त्यांना तत्काळ मदत देण्यासाठी काही नागरिक थेट नाल्यांमध्ये उतरले; परंतु नाल्याच्या दोन्ही बाजूंनी उंच भिंत असल्यामुळे व अंधार असल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. त्याचवेळी महामार्गाने क्रेन जाताना काही नागरिकांनी पाहिले. ती क्रेन घटनास्थळी आणून संबंधित तरुणांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर नजीकच्या रुग्णालयात त्यांना उपचारसाठी नेण्यात आले आहे. हे तिन्ही तरुण चिपळूण शहरातील रहिवासी असून त्यातील दोघेजण शहरातील खेड विभागातील स्थायिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नाही.