रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय संशयित रोहित अशोक भुटिया (मूळ रा. दिवळिया, जि. सुरेंद्रनगर, गुजरात, सध्या रा. रत्नागिरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी अवघ्या १७ वर्षे १६ दिवसांची असून, ती १६ आठवड्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्या संमतीविना वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. भीतीपोटी पीडितेने सुरुवातीला पोलिसांना खोटी माहिती दिली होती. मात्र, गरोदरपण स्पष्ट झाल्यानंतर तिच्या भावाने व मावशीने समजूत काढल्याने तिने खरा प्रकार रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात कथन केला.
या प्रकरणाची प्राथमिक चौकशी यापूर्वी गुजरात राज्यातील लकतर पोलिस ठाण्यात झाली होती. तेव्हा पीडितेने कारवाईच्या भीतीपोटी लग्न व शारीरिक संबंध गुजरातमध्येच झाल्याचा खोटा जबाब दिला होता. परंतु, सत्य बाहेर आल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात 'झिरो' क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२) (आय) ६४(२)(एम), पॉक्सो कायदा २०१२ चे कलम ४, ६, ८ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९ आणि १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.