रत्‍नागिरीत शिव पुतळ्याची विटंबना 
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्‍नागिरीत शिव पुतळ्याची विटंबना

पश्चिम बंगालच्‍या तिघांना अटक; हिंदू संघटनांकडून शहर पोलिस ठाण्यात तक्रार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची दारूच्या नशेत विटंबना केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. साजन फर्जान शेख (२६), समीर शेख (२६) आणि करीम शेख (२३, तिघेही मूळ पश्चिम बंगाल, सध्या कोकणनगर, रत्नागिरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री वरील तिघे संशयित मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील लोखंडी जिन्यावर चढून अश्‍वारुढ पुतळ्यावर हात ठेवून फोटो काढत होते. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिघांना हटकले. त्यावेळी ते दारूच्या नशेत असल्याचे समोर आले. त्‍यांना नागरिकांनी याबाबत जाब विचारताच करीम शेखने तेथून पळ काढला, तर साजन शेख व समीर शेख यांना नागरिकांनी पकडून ठेवले. नागरिकांनी शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले.

दरम्यान, मारुती मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी साजन व समीर यांची चौकशी केली असता त्यांनी तिसऱ्या साथीदाराची माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी सकाळी पोलिसांनी कोकणनगर येथील कामाच्या ठिकाणी जाऊन करीम शेखला अटक केली. या घटनेचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुतळ्याची विटंबना नेमकी कशाप्रकारे झाली आणि त्यामागील हेतू काय होता, याचा शोध घेतला जात आहे. हिंदू संघटनांकडून शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तिन्ही संशयितांना गुरुवारी सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT