रत्नागिरी ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावातील देसाई हायस्कूलसमोरील चढावात बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. सुमारास रसायनाने भरलेला ट्रेलर मागे येेऊन उलटल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मुंबई-गोवा महामार्ग तब्बल अडीच तास बंद राहिल्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून दुपारी 1 वा. उलटलेला ट्रेलर बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
ट्रेलर चालक दशरथ मुनिराज बिंद (49, रा. मानखुर्द, शिवाजीनगर मुंबई) हा बुधवारी सकाळी आपल्या ताब्यातील ट्रेलर (एमएच-43-बीपी-4646) वर आयसो टँक लोड करून गोव्यातील कारखान्यातून रायगडमधील उरण येथील न्हावा शेवा बंदरात जात होता. सकाळी 10 वा. सुमारास ट्रेलर हातखंबा येथील देसाई हायस्कूलसमोरील चढावात आला असता ओव्हरलोड केमिकलमुळे तो चढावात मागे येऊ लागला. त्यामुळे दशरथचा ट्रेलरवरील ताबा सुटल्यामुळे ट्रेलर चढावात उलटून हा अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रेलरचे व आयसो टँकचे नुकसान झालेले आहे. याबाबत ट्रेलर चालक दशरथ बिंद याने ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि अग्निशमन दल, उप प्रादेशिक परिवहन महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतुक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रेलर आणि ट्रेलर बाजूला करुन तब्बल अडीज तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळित केली. या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार रुपेश भिसे करत आहेत.