खेड: तालुक्यातील चाकाळे बौद्धवाडी येथे शनिवार दि. २१ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मोकळ्या माळावर भीषण वणवा लागल्याची घटना घडली. ही आग घरांच्या दिशेने पसरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खेड नगर परिषद अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलातील फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, सुरज शिगवण तसेच वाहन चालक गजानन जाधव यांनी तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली.
या वेळी अग्निशामक दलाच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे वणव्याच्या विळख्यात सापडण्याची शक्यता असलेली जवळील चार घरे मोठ्या धोक्यातून वाचली. मात्र, मोकळ्या माळावरील सुकलेले गवत, झुडपे तसेच काही मोठी झाडे आगीच्या भडक्यात जळून खाक झाली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, संबंधित विभागांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.