रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलिस परेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय सोहळा उत्साहात झाला. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी तसेच विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली.
रत्नागिरीचा सर्वांगीण विकास सुरू
शुभेच्छा संदेशात पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून विमानतळ उड्डाणासाठी सज्ज आहे, रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण होत आहे. प्रशासकीय इमारत, नगर परिषद, जिल्हा परिषद इमारती पूर्णत्वास आल्या असून 169 कोटी रुपयांच्या निधीतून पोलिस इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आरेवारे किनाऱ्यावर इको-टुरिझम प्रकल्प उभारला जात असून तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे लोकार्पण लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “महाराष्ट्राच्या परंपरा व संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीत घडण्याचा प्रयत्न असून या विकासाला जनतेची साथ आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
नावीन्यपूर्ण योजनांना राज्यस्तरीय मान्यता
जिल्ह्यातील नावीन्पूयर्ण उपक्रमांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला नासा-इस्रो अभ्यास दौरा उपक्रम आता संपूर्ण राज्यात राबण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली आहे.
विविध योजनांद्वारे लाभ
राज्यातील विविध योजनांचा आढावा देताना त्यांनी सांगितले की, पीएम किसान योजनेचे हप्ते वितरित झाले असून नमो किसान योजनेत जिल्ह्यातील 1.59 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. फळपीक विम्यामधून 107 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून अनेक रुग्णांना मदत मिळाली आहे.
संविधान भवन व शैक्षणिक सुविधा
जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत प्रत्येकी 3 कोटी रुपयांचे संविधान भवन उभारले जात असून त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू केले जाणार आहे. तसेच रत्नागिरीत केंद्रीय विद्यालयासाठी नाचणे येथे जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मान व पुरस्कार वितरण
कार्यक्रमात सागर कवच अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी यांचा सन्मान करण्यात आला. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.स्टुडंट पोलिस कॅडेट कार्यक्रमात यश मिळलेल्या जवाहर नवोदय विद्यालय, राजापूरच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान जिल्हा पोलिस दलासाठी नवीन वाहनांचे लोकार्पणही पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.