रत्नागिरी : सायबर फसवणुकीसाठी स्वतःची बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या खातेदारांविरुद्ध चिपळूण व रत्नागिरी शहर पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांत देशभरातील तब्बल ५८ ऑनलाईन फसवणूक प्रकरणांतील रक्कम संबंधित बँक खात्यांत जमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणात अज्ञात बँक खातेदार व त्याच्या साथीदारांनी बँक ऑफ इंडियाच्या खात्याचा वापर करून देशभरातील ५ ऑनलाईन फसवणूक प्रकरणांतील रक्कम स्वीकारून ती पुढील खात्यांत वर्ग केल्याचे निष्पन्न झाले आहे. दुसऱ्या प्रकरणातही अज्ञात खातेदार व त्याच्या साथीदारांनी बँक ऑफ इंडियाच्या खात्याचा वापर करून ७ ऑनलाईन फसवणूक प्रकरणांतील रक्कम स्वीकारून ती पुढे वर्ग केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वर प्राप्त तक्रारींच्या तपासादरम्यान इंडियन ओव्हरसीज बँकेच्या जुन्या माळनाका रोड शाखेतील संशयित खात्याचा वापर देशभरातील ४६ ऑनलाइन फसवणूक प्रकरणांत झाल्याचे आढळले. त्यापैकी ९ तक्रारींत १ लाख ५ हजार ८८ रुपये ६८ पैसे या खात्यात जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, उर्वरित प्रकरणांत अशाच प्रकारे व्यवहार झाल्याचा संशय आहे.
तीन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित अज्ञात खातेदार व त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. सायबर फसवणुकीसाठी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, पुढील तपास सुरू आहे.