Cannabis Sale Pudhari News Network
रत्नागिरी

Ratnagiri Crime : गांजा विक्रीच्या संशयावरून तिघांविरोधात गुन्हा

लेप्रसी कॉलनी परिसरात मध्यरात्री कारवाई; दोन दुचाकींसह ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील लेप्रसी कॉलनी परिसरात गांजा विक्रीच्या उद्देशाने अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३५ च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत गांजासह दोन दुचाकी असा एकूण ४ लाख २० हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

साहिल समीर सोलकर (२७, रा. कोकण नगर, रत्नागिरी), सुफियान अनिस गुहागरकर (२५, सध्या रा. कोकण नगर, रत्नागिरी) आणि यशराज राजेश देसाई (२४, रा. गणेश कॉलनी, हातखंबा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश पांडुरंग आखाडे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वुमन्स हॉस्पिटल ते चंपक मैदानाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यालगत, लेप्रसी कॉलनीसमोरील तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय परिसरात पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी तिघे संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यांच्याकडे विक्रीच्या उद्देशाने गांजा असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत ३४.५ ग्रॅम वजनाचा गांजा, १ लाख ७५ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची पिवळ्या रंगाची दुचाकी (एमएच ०८ बीडी ०१५०) आणि १ लाख २५ हजार रुपये किमतीची सुझुकी बर्गमन मॅक्स दुचाकी (एमएच ०८ बीझेड ८२१८) जप्त करण्यात आली. पोलिसांच्या नोंदीनुसार, गांजाची किंमत १ लाख २० हजार ७५० रुपये असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख २० हजार ७५० रुपये आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT