लांजा : मालवाहू ट्रकची खासगी आरामबसला मागून जोरदार धडक बसून घडलेल्या भीषण अपघातात २० प्रवासी जखमी झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे काजळी नदी पुलावर शुक्रवारी (दि. १३) पहाटे ४ च्या दरम्यान घडली. यात चौघेजण गंभीर तर १६ प्रवासी किरकाेळ जखमी झाले.
आरामबस विरार येथून मालवणच्या दिशेने निघाली होती तर मालवाहू ट्रक राजस्थानवरून गोव्याच्या दिशेने निघाला होता. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने आरामबसला दोनवेळा जबर धडक दिली. त्यामुळे आरामबस महामार्गावर कलंडली व १०० फूट फरफटत जाऊन संरक्षक भिंतीवर जाऊन धडकली. बसला धडक बसताच प्रवाशांच्या थरकाप उडाला. संरक्षक भिंतीमुळे बस अडली. अन्यथा नदीपात्रात कोसळली असती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात नयन दीपक कुलकर (१०, विरार), प्रकाश धकटू धावडे (५४, वारगाव कणकवली), प्रांजल मंगेश राऊत (९, रा. मुंबई), रुत्वी अभिषेक पारकर (१०, रा. मुंबई), यशवी अभिषेक पारकर (५४, रा. मुंबई), आराध्या अभिषेक पारकर (३८, रा. मुंबई), सुधा महेश सावंत (२८, रा. देवगड), अश्विनी जयवंत वालम (२०, रा. मुबंई), विश्वास लक्ष्मण राऊत (५५, रा. मुंबई), विनिता विश्वास राऊत (५२, रा. मुंबई), सूर्यकांत शंकर जडवी (रा. मुंबई) या प्रवाशांसह ट्रक चालक दिलावर सुमार खान (३६, रा. जैसलमैर, राजस्थान) अशा १२ प्रवाशांसह अन्य ८ जण जखमी झाले.
या अपघाताबाबत माहिती अशी की, श्री स्वामी कृपा नावाची खासगी आराम बस (एमएच. ४८ डीसी ९४३९) विरार येथून गुरुवारी दुपारी ३.३० वाजता प्रवासी घेऊन मालवण येथे जाण्यास निघाली. आरामबस हृषीकेश अनंत जोशी (२४, रा. कारगिल नगर, मधूरपाडा, विरार पूर्व) व त्याचा सहकारी चालक कुणाल प्रकाश कांबळे (२६, रा. विजयनगर, विरार पूर्व) हे दोघे बदलीने चालवत होते. आरामबस मुंबई-गोवा महामार्गाने जात असताना बस लांजा तालुक्यातील अंजणारी येथील काजळी नदी पुलानजीक शुक्रवारी पहाटे ३.४५ च्या दरम्यान आली असता याचदरम्यान राजस्थान ते गोव्याच्या दिशेने सोळा चाकी ट्रक (आरजे १९, जीजे ४७८६) हा महेंद्र कंपनीच्या वाहनांचे बॉडीपार्टस् व मार्बल्स असे अवजड साहित्य घेऊन गोव्याच्या दिशेने निघाला होता. ट्रक दिलावर सुमार खान (३६, रा. जैसलमैर, राजस्थान) हा चालवत होता. क्लिनर सुभान खान (२२, रा. जैसलमैर, राजस्थान) हा सोबत होता. अंजणारी घाटाच्या तीव्र उतारावर आरामबस आली असता बस मागे भरधाव असणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे असणाऱ्या आरामबसला मागून जोरदार दोनवेळा धडक दिली.
ट्रकची धडक एवढी जबर होती की, आराम बस महामार्गाच्या मार्गिकेवरून १०० फूट फरफटत गेली. बस महामार्गावरून फरफट जाताच प्रवाशांचा थरकाप उडाला व प्रवाशांनी बचावासाठी आरडाओरडा केला. आराम बस काजळी नदीपात्रावर बांधलेल्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकली तर ट्रक महामार्गाच्या एका बाजूला जाऊन कलंडला. अपघात घडताच महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांनी थांबून आराम बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना मदतकार्य करून त्यांना बाहेर काढले. अपघातात गंभीर जखमी विश्वास राऊत, विनिता राऊत, सूर्यकांत जडवी या तीन प्रवाशांसह ट्रक चालक दिलावर खान यांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.
बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप काढले बाहेर
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा वाहतूक मदत केंद्र आणि लांजा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवान व पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातातील सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, पाली व लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बसमधील ४ गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.