चिपळूण : ठाणे येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चिपळूण-गुहागर परिसरात नवीन एमआयडीसी उभारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर गुहागर मतदारसंघात आ. भास्कर जाधव सुचवतील तिथे ही एमआयडीसी करण्याचे ना. सामंत यांनी मान्य करून तशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
गुहागर व चिपळूण तालुक्यांच्या सीमेवरील १४ गावांच्या परिसरात स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी तत्कालीन मंत्री तथा आमदार भास्कर जाधव यांनी मंजूर करून आणलेली एमआयडीसी राज्यातील सत्तांतरानंतर दुर्लक्षित राहिली आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने ती अचानक रद्द केली. मात्र, ही एमआयडीसी पुन्हा सुरू होण्यासाठी आ. जाधव यांनी सातत्याने केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे.
आमदार जाधव यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना गुहागर व चिपळूण तालुक्यांच्या सीमेवरील मार्गताम्हाणेसह १४ गावांच्या परिसरात एमआयडीसी मंजूर करून आणली होती. टेक्स्टाईल पार्क, फूड प्रोसेसिंग व लॉजिस्टिक हब यांसारखे उद्योग उभारून स्थानिक पातळीवर ४ ते ६ हजार रोजगार निर्माण करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही एमआयडीसी रद्द करून घेतली. मात्र, आमदार जाधव यांनी हा विषय सोडून न देता प्रत्येक विधानसभा अधिवेशनात प्रदूषण विरहीत मंजूर एमआयडीसी रद्द करण्यामागचे कारण काय, स्थानिक बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या संधी का हिरावून घेतल्या, असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी शासनाला सातत्याने धारेवर धरले. जुलै २०२६ मधील पावसाळी अधिवेशनातही त्यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
आमदार भास्कर जाधव यांच्या सूचनेनुसार जमीन जबरदस्तीने तसेच घर, गावठाण, मंदिरे तसेच फळबाग असलेल्या जमिनी संपादित केल्या जाणार नाहीत, असे बैठकीत मान्य करण्यात आले. या बैठकीला एमआयडीसीचे जॉईंट सेक्रेटरी कुणाल खेमनार, डेप्युटी सेक्रेटरी आबासाहेब कवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर, उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रक्रियेच्या गतीसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्याचे आदेश
उद्योगमंत्री सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत ठाणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या स्वतंत्र बैठकीला आमदार भास्कर जाधव यांना आमंत्रित केले होते. या बैठकीत चिपळूण-गुहागर परिसरात नवीन एमआयडीसी उभारण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक मान्यता देण्यात आली. या औद्योगिक क्षेत्रासाठी सलग १०० एकर जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात स्वतंत्र खिडकी सुरू करण्याचे आदेश उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश निगाडे यांना दिले.