रत्नागिरी : रत्नागिरीतील थिबाकालीन बुद्ध विहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी थिबाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी बौद्धविहारासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेत प्रशासनाच्या वतीने होऊ घातलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम प्रक्रिया रद्द करावी, तसेच ती जागा बौद्ध समाजाला मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आरपारची लढाई आंबेडकरी जनता लढेल, असा इशारादेखील देण्यात आला. यासंबंधीचे निवेदन मोर्चानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना देण्यात आल़े
थिबाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने या बुद्धविहाराच्या बचावासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी तालुक्यातील आंबेडकरी जनतेकडून मोठा प्रतिसाद या मोर्चाला लाभल़ा. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता थिबा कालीन बुद्धविहाराच्या जागेत त्रिसरण पंचशील घेवून मोर्चाला सुरुवात करण्यात आल़ी. यावेळी भंत्ते सुमेध बोधी व भिक्खूगण उपस्थित होत़े त्याचसोबत संघर्ष समितीचे अध्यक्ष एल़ व्ह़ी. पवार व कार्याध्यक्ष अनंत सावंत, सचिव अमोल जाधव, रत्नदीप कांबळे, प्रकाश पवार, दीपक जाधव व बौद्ध जनता उपस्थित होत़ी.
थिबा कालीन बुद्धविहार येथून मोर्चा जेलरोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आल़ा. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आल़े तसेच जोरदार घोषणा यावेळी आंबेडकरी जनतेकडून देण्यात आल्या. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मार्चाला विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केल़े
माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनीही पाठिंबा दिला. बौद्ध समाजाकडून विहार बचावासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला माजी आमदार व शिवसेना उबाठाचे उपनेते बाळ माने व माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उपस्थिती लावल़ी. यावेळी माने यांनी पालकमंत्री उदय सामंत हे जनतेची दिशाभूल करत आहेत तसेच समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली तर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनीही राष्ट्रवादी पक्षाकडून पाठिंबा जाहीर केल़ा.