राजापूर : घरगुती कारणातून झालेला वाद विकोपाला गेल्याने भावाने सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना राजापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. स्वप्नील ठाकरे (४५रा. नाटे ठाकरेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ व पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१६) दुपारी नाटे ठाकरेवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाटे ठाकरेवाडी येथील स्वप्नील ठाकरे हे रत्नागिरी येथे वास्तव्याला असून गुरूवारी (दि.१५) ते आपल्या लहान मुलासह नाटे गावी आले होते. गुरूवारी रात्री त्यांनी त्यांचा मोठा भाऊ चंद्रकांत ठाकरे व पुतण्या अमोल चंद्रकांत ठाकरे (वय २८) यांच्यासोबत मद्यप्राशन केले. यावेळी त्या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर या रागातून शुक्रवारी (दि.१६) दुपारी भाऊ चंद्रकांत आणि पुतण्या यांनी पुन्हा ठाकरे यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने दोघांनी ठाकरे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ठाकरे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसानी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शेवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. भावांसह पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. नाटे ठाकरेवाडी येथे घडलेल्या या घटनेने तालुक्यात एका खळबळ उडाली आहे.