राजापूर : तालुक्यातील मौजे तळवडे येथील तलाठी कार्यालयात २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात कोतवाल संजना नंदकुमार माने आणि मंडळ अधिकारी पुनम जयसिंग गावीत यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या दोन्ही महिलांना रत्नागिरीत न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या शासकीय कामासाठी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी १५ मे रोजी तळवडे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी कोतवाल संजना माने यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. तर तळवडे मंडळ अधिकारी पुनम गावीत यांच्यावर लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिस ठाण्यात या दोन्ही महिलांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ तसेच १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या दोन्ही संशयीत आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.