खेड / जालगाव : जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने बुधवारी सायंकाळी 5.25 वा. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खेड-मंडणगड रस्त्यावर मौजे मुगीज येथे संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेतले. तपासा दरम्यान प्रकाश राम जगताप (33 वर्षे, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्याकडून बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थ सदृश 70 जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयिताकडील स्फोटक पदार्थ सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्यास तत्काळ ताब्यात घेऊन दापोली पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संशयित प्रकाश जगताप (राहणार कातकरवाडी शिरखल) हा गावठी बॉम्ब घेऊन येत असल्याची माहिती रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभागाला समजली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकर, विजय आंबेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता सापळा रचून प्रकाश जगताप याला तो मंडणगडवरून आपले गाव शिरखल येथे जात असताना मुंगीज गावानजीक त्याला ईको गाडीसह ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ सुपारीएवढे गोल आकाराचे सुमारे 70 गावठी बॉम्ब आढळून आले. त्याला मुद्देमालासह दापोली पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नागरिकांनी संशयास्पद माहिती तातडीने कळवावी
या संपूर्ण घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक यादव करीत आहेत जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यास अथवा डायल 112 या संपर्क क्रमांकावर कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलिस दलाने केले आहे.