रत्नागिरी

Ratnagiri Bomb Blast : कुंपणासाठी बांबू गोळा करताना गावठी बॉम्बचा स्फोट, महिलेच्या हाताची पाचही बोटे तुटली

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यातील जांभारी येथे घराच्या कुंपणासाठी बांबू गोळा करत असताना, जमिनीवर ठेवलेल्या गावठी बॉम्बला हाताचा धक्का लागून झालेल्या स्फोटात एक महिला गंभीर जखमी झाली. या भीषण स्फोटात महिलेच्या डाव्या हाताची पाचही बोटे तुटली आहेत. ही थरारक घटना मंगळवारी (दि. १९) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. रेश्मा प्रसाद सुर्वे (वय ४७, रा. जांभारी, रत्नागिरी) असे या बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी रेश्मा या त्यांचे पती प्रसाद सुर्वे यांच्यासोबत घराच्या मागील बाजूस असलेल्या 'भूताचा बंगला' या परिसरात कुंपणासाठी बांबू तोडण्यासाठी गेल्या होत्या. बांबू तोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पती प्रसाद यांना तहान लागल्यामुळे ते पाणी पिण्यासाठी घरात गेले. दरम्यान, रेश्मा या जमिनीवर तोडून ठेवलेले बांबू एकत्र करून उचलत असताना, तिथे आधीच लपवून ठेवलेल्या गावठी बॉम्बला त्यांचा हात लागला. यावेळी अचानक मोठा स्फोट होऊन रेश्मा यांच्या डाव्या हाताची पाचही बोटे तुटली आणि त्या रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्या.

स्फोटाचा प्रचंड आवाज ऐकून पती प्रसाद सुर्वे तातडीने घटनास्थळी धावले. पत्नीच्या हाताची छिन्नविच्छिन्न अवस्था पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ आपल्या मित्रांना मदतीसाठी बोलावून घेतले. त्या जागेची बारकाईने पाहणी केली असता, तिथे जंगली जनावरांची आणि पक्ष्यांची शिकार करण्यासाठी अज्ञातांनी ठेवलेले अनेक गावठी हातबॉम्ब पसरलेल्या स्थितीत आढळून आले. प्रसाद सुर्वे यांनी मित्रांच्या मदतीने पत्नीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेची जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत प्राथमिक नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT