खोटी सही करून दोन लाखांचे बोगस कर्ज! 
रत्नागिरी

Ratnagiri Fraud : खोटी सही करून दोन लाखांचे बोगस कर्ज!

पाचल आरडीसी बँकेतील प्रकरणाची चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पाचल : पाचल येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत खातेदाराच्या कथित बनावट सहीद्वारे दोन लाख रुपयांचा ऑनलाईन कर्ज प्रस्ताव दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पापड बनविण्याच्या मशीनसाठी आपल्या नावाने कर्ज प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित खातेदाराने हा प्रस्ताव आपण केलेला नसल्याचा दावा करीत बँक प्रशासन आणि पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे. या प्रकारामुळे पाचल परिसरात खळबळ उडाली आहे.

तळवडे-राववाडी येथील संतोष बाबुराव खानविलकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाचल शाखेतील खातेदार आहेत. त्यांच्या नावावर पापड बनविण्याच्या मशीनसाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची माहिती बँकेकडून संपर्क साधल्यानंतर त्यांना मिळाली. मात्र, आपण असा कोणताही कर्ज प्रस्ताव दाखल केलेला नसून, त्यावरील सहीही बनावट असल्याचा दावा खानविलकर यांनी केला आहे.

सुमारे दोन लाख रुपये किमतीचा हा कर्ज प्रस्ताव असल्याची माहिती पुढे आली आहे. आपल्या नावाने आणि खोटी सही करून कर्ज प्रक्रिया करण्यात आल्याचा संशय व्यक्त करीत खानविलकर यांनी हे कर्ज प्रकरण तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात कर्ज प्रस्ताव कोणी दाखल केला, त्यासाठी कोणती कागदपत्रे वापरण्यात आली, सहीची पडताळणी कशी झाली आणि ऑनलाईन कर्ज प्रक्रियेत नेमकी कोणती त्रुटी राहिली, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी त्यांनी बँक प्रशासन तसेच पोलिसांकडे केली आहे.

खातेदाराच्या कथित बनावट सहीद्वारे कर्ज प्रस्ताव दाखल झाल्याच्या या प्रकारामुळे बँकेच्या ऑनलाईन कर्ज प्रक्रियेतील सुरक्षितता, कागदपत्रांची पडताळणी आणि ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांच्या संरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. चौकशीत या प्रकरणाची वस्तूस्थिती स्पष्ट करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडूनही होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT