सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ खलाशाचा मृतदेह सापडला File Photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime| सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ खलाशाचा मृतदेह सापडला

दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद, पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

दापोली : हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील समुद्रात श्रीवर्धन येथील ४० वर्षीय खलाशाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. रोहिदास यशवंत धरणकर (४०, रा. कोळीवाडा, श्रीवर्धन, जि. रायगड) असे मृताचे नाव आहे. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला.

रोहिदास धरणकर हे महेश पोशा चोलकर यांच्यासोबत बोटीवर होते. १ ऑक्टोबर रोजी रात्री जेवण करून दोघे झोपले. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास महेश चोलकर यांच्या लक्षात रोहिदास बोटीवर दिसत नसल्याचे आले. त्यांनी तत्काळ परशुराम बाळ्या चौगुले यांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर चौगुले यांनी अडखळ खाडी येथे बोटीवर तसेच खाडीकिनारी शोध घेतला. मात्र, रोहिदास यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यांच्या नातेवाइकांकडेही चौकशी करण्यात आली. ते श्रीवर्धन येथील गावी गेले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खलाशी, ग्रामस्थ आणि नातेवाइकांनी अडखळ, आंजर्ले खाडी तसेच सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील समुद्रात शोधमोहीम सुरू केली.

चार दिवसांच्या शोधानंतर ४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास सुवर्णदुर्ग किल्ल्यापासून सुमारे सात वाव अंतरावर समुद्राच्या पाण्यात रोहिदास धरणकर यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत परशुराम चौगुले यांनी दापोली पोलिसांना खबर दिली. त्यानुसार ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.५३ वाजता दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT