प्रवीण शिंदे
दापोली : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काळी मिरी हे मुख्य पीक नसले तरी पारंपरिक पिकांसोबत पूरक उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन ठरत आहे. भात, काजू, सुपारी, नारळ यांसारख्या पिकांसोबत काळी मिरीची लागवड केल्याने शेतकऱ्यांना वर्षभर अतिरिक्त उत्पन्नाची जोड मिळत असून त्यामुळे आर्थिक स्थैर्याला मोठा हातभार लागत आहे.
तालुक्यातील डोंगराळ व दमट हवामान असलेल्या भागात मिरीची वेल आंबा, नारळ व सुपारीच्या झाडांवर चढवून घेतली जाते. त्यामुळे स्वतंत्र लागवडीसाठी वेगळ्या क्षेत्राची गरज लागत नाही आणि कमी खर्चात उत्पादन घेता येते. उत्पादन प्रमाण तुलनेने मर्यादित असले, तरी बाजारात मिळणारा दर चांगला असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळतो. शेतकऱ्यांच्या मते केवळ भात किंवा काजूसारख्या पिकांवर अवलंबून न राहता काळी मिरीसारखी पूरक पिके घेतल्यास उत्पन्नातील जोखीम कमी होते. एखाद्या हंगामात मुख्य पिकांचे नुकसान झाले, तरी मिरीच्या उत्पन्नामुळे काही अंशी भरपाई होते, असा अनुभव अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते दापोली तालुक्यात काळी मिरी लागवडीस मोठी संधी असून योग्य मार्गदर्शन, रोगनियंत्रण आणि सुधारित वाणांचा वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यामुळे काळी मिरी हे दापोलीतील शेतकऱ्यांसाठी इतर उत्पन्नाच्या साधनांसोबत महत्त्वाची आर्थिक जोड ठरत आहे.
काळी मिरी पीक हे हमखास उत्पन्नाचे साधन आहे. एकदा मेहनत घेतली की हे पीक कायमस्वरूपी उत्पन्न देणारे ठरते. बाजारात काळी मिरीला चांगला दर मिळतो.- शैलेश चव्हाण, शेतकरी, करंजाळी