खेड : बहुचर्चित भरणे-खेड-दापोली मार्गाच्या कामाची रखडपट्टी उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. खेड हद्दीतील अवघ्या 2 कि.मी. अंतरावरील रस्त्याचे काम सुरू असून, येत्या 30 एप्रिलपर्यंत भरणे ते अण्णाचा पऱ्या दरम्यानचे काम पूर्ण करून पावसाळ्यात दुहेरी मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडच्या उपअभियंता आशा जठाल यांनी दिली.
भरणे ते खेड मार्गावरील एका मार्गिकेचे काम पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे, तर दुसऱ्या मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. मात्र, पहिल्या मार्गिकेचे काम तब्बल पाच महिने लांबल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीसह विविध अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता दिलेली 30 एप्रिलची मुदत ठेकेदार पाळणार का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.
दरम्यान, दापोली-खेड या 29 कि.मी. मार्गावर विविध ठिकाणी कामे सुरू असून, खेड शहरातील तीनबत्ती नाका ते डेंटल कॉलेज या मार्गावरील काम संथ गतीने सुरू आहे. सुर्वे इंजिनिअरिंगजवळील मोरी काढून त्या ठिकाणी सुमारे 8 फूट उंचीचा पूल उभारण्यात येत आहे. पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी हा उपाय करण्यात येत आहे. याशिवाय, रस्त्याखालील नगर परिषदेची पाण्याची पाइपलाइन स्थलांतरित करण्याचे काम सुरू असल्याने कामात विलंब होत आहे.
या प्रकल्पांतर्गत अण्णाचा पऱ्या ते कॅफे कॉर्नरपर्यंत 15 मीटर रुंदीचा रस्ता, खांबतळे ते नाना-नानी पार्कदरम्यान 12 मीटर, तर नाना-नानी पार्क ते डेंटल कॉलेजदरम्यान 15 मीटर रुंदीचा रस्ता उभारण्यात येणार आहे. खांबतळे येथील धोकादायक वळणही कमी करण्यात येणार आहे. मात्र, खांबतळे ते अण्णाचा पऱ्या दरम्यानची जमीन अद्याप नगरपरिषदेकडे हस्तांतरित झालेली नसल्याने आणि पाइपलाइन बदलण्याचे काम पूर्ण न झाल्याने या टप्प्यातील काम पावसाळ्यानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.
खेड बसस्थानक ते डेंटल कॉलेज दरम्यान पर्यायी रस्ता काढण्यात आला असला तरी या मार्गावर धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जागा मालकांच्या विरोधामुळे या रस्त्यावर खडी टाकता आलेली नाही. परिणामी, नागरिकांना तोंड झाकून प्रवास करावा लागत आहे, मातीवर पाणी मारल्याने दुचाकी घसरून अपघातही घडत आहेत. अण्णाचा पऱ्या ते बसस्थानक दरम्यान काम सुरू करताना वाहतूक वळवण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. यासाठी खेड नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाला कसरत करावी लागणार आहे.