रत्नागिरीतील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल 
रत्नागिरी

Ratnagiri Tourism : रत्नागिरीतील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल

मांडवी, भाट्ये बीचवर पर्यटकांची गर्दी; थर्टीफस्ट, नववर्ष स्वागत धुमधडाक्यात होणार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : नाताळासह थर्टीफस्ट, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी आता कोकणाकडे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफूल्ल झाली आहेत. शहरातील मांडवी बीच, भाट्ये बीच तसेच गणपतीपुळे, आरे -वारे बीच, मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. समुद्रकिनाऱ्यासह ऐतिहासिक, धार्मिक स्थळांकड धाव घेतली आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील लॉज, हॉटेल्स बुकिंगला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

यंदाच्या वर्षी पावसाळा लांबला असल्यामुळे ऐन हंगाम वाया गेला होता. त्यामुळे पर्यटक ही नाराज झाले होते. दिवाळीपासून सुरू झालेला पर्यटन हंगाम थंडीचा मौसम आणि सलग सुट्ट्यांमुळे आता शिखरावर पोहोचला आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांसाठी सुगीचे दिवस आले असून हॉटेल, लाजिंग, घोडागाडी, वॉटर स्पोर्टस आदी व्यवसाय तेजीत आहेत. सध्या विविध भागातील पर्यटक मोठ्या संख्येने शहरासह जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ला, थिबा पॉईट, लोकमान्य टिळक संग्रहालय, भगवती मंदिर, रत्नागिरी मत्सालय, शिवसृष्टी, तारांगण, वीर सावरकर कोठडी यासह प्राचीन मंदिरे, कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद पर्यटक घेत आहेत.

चिमुकल्यांसह तरुणाईचा उत्साह

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, दापोली, वेळणेश्वर, राजापूर यासह विविध समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून स्कुबा डायव्हिंग, जलक्रिडा यासह विविध प्रकाराचा आस्वाद घेत आहेत. बच्च्ो कंपनीनी मोठी गर्दी उसळली आहे.

समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांची खबरदारी

दरवर्षी रत्नागिरी शहर, जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून हा ओघ नववर्षाच्या स्वागतापर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान, थर्टी- फर्स्ट सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. समुद्रकिनाऱ्यावर बंदोबस्त वाढवला आहे, प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर मदत कक्ष उभारण्यात आला आहे. अतिउत्साही, मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार असून उघड्यावर मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली आहे.

या प्राचीन मंदिरे, किल्ल्यांस भेटी

रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळेबरोबरच प्राचीन कोकण, गोपाळगड किल्ला, अंजनवेल किल्ला, बामणघळ, श्रीदेव व्याडेश्वर मंदिर, जयगड लाईट हाऊस, परशुराम मंदिर, मार्लेश्वर मंदिर, पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर, झरीविनायक मंदिर, राजापूरची गंगा, कर्णेश्वर मंदिर, कसबा येथील संभाजी महाराज स्मारक, कड्यावरचा गणपती, पूर्णगड किल्ला, कशेळीतील सूर्य मंदिर, चंडिका देवी मंदिर, पन्हाळेकाजी लेणी, पतितपावन मंदिर, शिवसृष्टी डेरवण, उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड,रमाई आंबेडकर स्मारक, दाभोळ बंदर यासह विविध पर्यटनस्थळासह मंदिर, किल्ल्यांना पर्यटक भेटी देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT