चिपळूण शहर : महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा रत्नागिरी (चिपळूण) यांच्या माध्यमातून चिपळुणात 8 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय बांधावरच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या लोगोचे प्रकाशन स्वागताध्यक्ष व नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या हस्ते लोटिस्मा वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात करण्यात आले. यावेळी मसाप शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के व साहित्यप्रेमी उपस्थित होते. या लोगोची संकल्पित छायाचित्र राघव खर्चे या तरुणाने अतिशय कल्पकतेने केले आहे.
मसाप जिल्हा शाखा रत्नागिरी (चिपळूण) यांच्या माध्यमातून चिपळुणात एक दिवशीय बांधावरचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातील ही पहिलीच संकल्पना असून या साहित्य संमेलनाचे आयोजन चिपळुणातील धामणवणे येथील निसर्गरम्य डोंगर भागातील एका पठारावर करण्यात आले आहे. स्वागताध्यक्ष म्हणून नगरसेवक मोदी व संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. बारटक्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे तर राघव खर्चे या तरूणाने या संमेलनासाठी लोगो तयार केला असून त्याचे प्रकाशन नुकतेच सर्व साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत मोदी यांनी केले.
8 फेब्रुवारी रोजी धामणवणे येथे सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत बांधावरचे संमेलन होणार आहे. यावेळी अन्य साहित्य संमेलनासारखा कोणत्याही प्रकारचा मंडप अथवा भव्यदिव्य कार्यक्रमांची रेलचेल याचे नियोजन नसले तरी डोंगरातील विशाल झाडांच्या सावलीखाली असलेल्या डोंगरातील पठारावर आणि बांधांवर सर्व वयोगटातील साहित्यप्रेमी व साहित्यिक एकवटणार आहेत. यावेळी साहित्य संमेलनात असलेल्या साहित्यविषयक उपक्रमांची मैफल रंगणार आहे. कथाकथन, कविता, मराठी भाषेविषयी चर्चा, मराठी भाषा आजची व भविष्यातील..., भूतकाळातील व आजचे साहित्य लेखन यावर आधारित हे संमेलन दिवसभर होणार आहे. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांच्यासह अन्य नामवंत साहित्यिक प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.