Ratnagiri | रत्नागिरीचे मत्स्यालय उतरलेय पर्यटकांच्या पसंतीस; ५५ फुटी देवमाशाचा सांगाडा आकर्षणाचा विषय 
रत्नागिरी

Ratnagiri | रत्नागिरीचे मत्स्यालय उतरलेय पर्यटकांच्या पसंतीस; ५५ फुटी देवमाशाचा सांगाडा आकर्षणाचा विषय

वर्षभरात दीड लाखांहून अधिक पर्यटकांची भेट; बोटिंगचीही सुविधा

पुढारी वृत्तसेवा

​रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोकणची विस्तीर्ण किनारपट्टी, तेथील निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आला आहे. या साऱ्यात आता रत्नागिरी येथील शासकीय मत्स्यालय हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र बनत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील आकडेवारीवरून या मत्स्यालयाने लोकप्रियतेचा एक नवा टप्पा ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या एका वर्षात तब्बल १ लाख ६२ हजार ८०० देशा-परदेशांतील पर्यटकांनी या मत्स्यालयाला भेट देऊन येथील अथांग आणि रंगीबेरंगी जलचरांच्या दुनियेचा आनंद लुटला आहे.

​रत्नागिरीच्या पर्यटनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या मत्स्यालयाने केवळ पर्यटकांचे मनोरंजनच केले नाही, तर शासकीय महसुलातही मोठी भर घातली आहे. वर्षभरात झालेल्या या विक्रमी गर्दीमुळे मत्स्यालयाच्या प्रशासनाला तब्बल ३२ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मत्स्यालयात ठेवण्यात आलेले विविध प्रजातींचे रंगीबेरंगी मासे, दुर्मिळ सागरी जीव आणि त्यांची माहिती देणारी व्यवस्था यामुळे बालगोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच ही भेट एक अविस्मरणीय अनुभव ठरत आहे. वीकेंड आणि सुट्ट्यांच्या कालावधीत तर येथे पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने वळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

​या मत्स्यालयाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे येथील 'फिश पाँड' (माशांचे तळे) आणि तिथे सुरू असलेली बोटिंगची (नौकाविहार) सुविधा. मत्स्यालयात येणारे पर्यटक केवळ मासे पाहूनच थांबत नाहीत, तर या शांत तलावात बोटिंगचा आनंद घेण्यासही पसंती देत आहेत. गेल्या वर्षभरात १० हजार ५२६ पर्यटकांनी या बोटिंग सुविधेचा मनमुराद आनंद घेतला. या माध्यमातून प्रशासनाला २ लाख १० हजार ५२० रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला आहे. निसर्गाच्या सानिध्यात, संथ पाण्यात बोटिंग करण्याचा हा अनुभव पर्यटकांचा आनंद द्विगुणित करत आहे.

मत्स्यालयातील एकूण पर्यटक आणि बोटिंगची क्रेझ यामुळे रत्नागिरीच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मत्स्यालय प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि उत्तम व्यवस्थापन यामुळेच ही मोठी संख्या गाठणे शक्य झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT