पायलाग प्रतिबंधासाठी जिल्‍ह्यात २० हजार पशुंचे लसीकरण  
रत्नागिरी

Ratnagiri News : पायलाग प्रतिबंधासाठी जिल्‍ह्यात २० हजार पशुंचे लसीकरण

१ लाख ४६ हजार पशुंच्‍या लसीकरणाचे उद्दिष्ट; १३ ऑगस्‍टपासून ते २८ सप्‍टेंबरपर्यंत असणार लसीकरण

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : जिल्‍ह्यातील पशुधनाला लाळ्या-खुरकूत अर्थात पायलाग व खुरकत या संसर्गजन्‍य रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत २० हजार पशूंचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १३ ऑगस्‍टपासून सुरू झालेली ही मोहीम ४८ दिवस चालणार असल्‍याचे सांगण्यात आले. जास्‍तीत जास्‍त जनावरांना पायलाग प्रतिबंधक लस टोचून घ्यावी, असेही सांगण्यात आले.

जिल्‍ह्यात लहान-मोठे मिळून सुमारे १ लाख ९६ हजार पशुधन आहे. त्‍यापैकी १ लाख ४६ हजार पशूंचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाने निश्चित केले आहे. गायी, म्‍हशींसह पात्र पशुधनाला पायलाग प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लाळ्या-खुरकत हा जनावरांमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्‍य रोग आहे. या रोगामध्ये जनावरांच्‍या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळणे, तोंड व जिभेवर फोड येणे, खुरांना जखमा होणे, लंगडणे, ताप येणे तसेच दूध उत्‍पादनात मोठी घट होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्‍यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. ही लस वर्षातून २ वेळा पावसाळ्यापूर्वी व हिवाळ्यापूर्वी घेतली जाते. ४ महिन्‍यांच्‍या वासरापान पुढे सगळ्या जनावरांना ही लस देण्यात येते.

रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित लसीकर महत्‍वाचे आहे. पशुपालकांनी आपल्‍या जनावरांचे लसीकरण करून घेण्यासाठी संबंधित पशुवैद्यकी अधिकारी किंवा पशुसंवर्धन विभागाच्‍या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्‍ह्यातील पशुधनाचे लसीकरण निर्धारित उद्दिष्टानुसार पूर्ण करण्यासाठी विभागाकडून प्रयत्‍न सुरू असून आतापर्यंत २० हजार पशूंचे लसीकरण झाले आहे. या मोहिमेत अधिकाधिक पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार आहे.
- डी. के. झंझाड, जिल्‍हा उपायुक्‍त पशुसंवर्धन विभाग, रत्‍नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT