आंबा घाटात कोळशाच्या ट्रकला आग; मोठा अनर्थ टळला 
रत्नागिरी

Ratnagiri Truck Fire : आंबा घाटात कोळशाच्या ट्रकला आग; मोठा अनर्थ टळला

महामार्ग पोलिस, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांची तत्परता; ३१ टन कोळसा सुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात रविवारी पहाटे कोळसा वाहतूक करणाऱ्या १४ टायरी ट्रकच्या केबिनला अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ट्रकमध्ये तब्बल ३१ टन कोळसा असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, महामार्ग पोलिस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.

एमएच-०९-एफएल-९०४७ क्रमांकाचा ट्रक जयगड येथून सातारा जिल्ह्यातील उंब्रजकडे कोळसा घेऊन निघाला होता. चालक शंभू चरण यादव ( ४८, रा. हजारीबाग, झारखंड) पहाटे सुमारे ४ वा.च्या सुमारास आंबा घाटातील गणेश मंदिराजवळ पोहोचले असता ट्रकच्या इंजिनमध्ये ओव्हरहिटिंग मुळे केबिनमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण केबिनला वेढले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी पोलिस निरीक्षक दिपाली जाधव, पीएसआय पाटील, जीपीएसआय सावंत, पोलीस कर्मचारी वाकरे, लांबोरे, दाभाडे, संकपाळ, शिवलकर, चालक कांबळे तसेच हेडकॉन्स्टेबल जाधव यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले.

देवरुख पोलिस ठाण्याचे कर्मचारी, देवरुख नगरपंचायतीचे अग्निशमन दल आणि आंबा गावातील ‘मृत्युंजयदूत’ विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनीही मदतीसाठी धाव घेतली. आग लागल्यानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करत वाहनांची सुरक्षितरीत्या वाहतूक सुरू ठेवली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. विशेष म्हणजे ट्रकमधील कोळशाच्या साठ्यापर्यंत आग पोहोचण्यापूर्वीच ती आटोक्या आणण्यात आल्याने गंभीर दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ट्रकच्या केबिनचे मोठे नुकसान झाले असले तरी कोळशाचा साठा सुरक्षित राहिला. स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी आपत्ती टळल्याने त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पुढील तपास महामार्ग पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT