राज्यात सर्वाधिक दूषित पाणी रत्नागिरीत pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri News| जिल्‍ह्यात पाण्याचे संकट; २१ नमुने आढळले दूषित

चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, रत्‍नागिरीत दूषित पाणी नमुने

पुढारी वृत्तसेवा

जाकीरहुसेन पिरजादे

रत्‍नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत चिंताजनक बाब समोर आली आहे. जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि आरोग्य विभागामार्फत सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांच्या तपासणीत एकूण २१ नमुने दूषित आढळले आहेत. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाण्याची टंचाई जाणवत असतानाच दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात तपासलेल्या नमुन्यांपैकी सरासरी १.६२ टक्के पाणी दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, मंडणगड, खेड आणि रत्नागिरी या पाच तालुक्यांमध्ये दूषित पाण्याचे नमुने आढळले आहेत. त्यामुळे या भागांतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या शुद्धतेबाबत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे दापोली, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यांतील तपासणी केलेले पाणी नमुने पिण्यायोग्य असल्याचे आढळले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीसाठा कमी होत आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

आगामी काळात मिळेल ते पाणी साठवून ठेवण्याची गरज भासू शकते. मात्र, उघड्यावर किंवा अस्वच्छ भांड्यांमध्ये दीर्घकाळ साठवलेले पाणी दूषित होण्याचा धोका असतो. अशा पाण्याचा वापर केल्यास अतिसार, उलट्या, पोटाचे विकार यांसारखे जलजन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळातही पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

ऑक्टोबरमध्ये १८ नमुने दूषित

ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील आठ तालुक्यांतून एकूण १ हजार १११ पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये मंडणगड १५५, खेड ४४, गुहागर १३३, चिपळूण १४२, संगमेश्वर १२९, रत्नागिरी ९३, लांजा १६४ आणि राजापूर २५१ नमुन्यांचा समावेश होता. या तपासणीत १८ नमुने दूषित आढळले. सप्टेंबर महिन्यातही ७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी तीन नमुने दूषित आढळले होते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत एकूण २१ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दूषित नमुने आढळलेल्या तालुक्यांमध्ये हातपंप आणि विहिरींच्या पाण्याचा वापर करताना नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. तपासणीत दूषित ठरलेले पाणी थेट पिण्यासाठी वापरणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे, पाणी साठवण्याची भांडी नियमित धुणे आणि पिण्याचे पाणी झाकून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

पाणी उकळून पिण्याचे आवाहन

दूषित पाण्याचे नमुने आढळलेल्या पाच तालुक्यांमध्ये ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. पाणी उकळून आणि थंड झाल्यानंतर स्वच्छ, झाकण असलेल्या भांड्यात साठवून त्याचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईबरोबरच जलजन्य आजारांचे संकट उद्‌भवू नये, यासाठी ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणांनीही पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता व तपासणी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT