रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम 50 टक्क्यांहून अधिक झाले असून विमातळाच्या सुसज्ज टर्मिनलचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दि. 31 मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत टर्मिनल इमारत, टॅक्सी-वे पूर्ण होऊन विमानतळ उड्डाणासाठी सज्ज करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शनिवारी रत्नागिरी विमानतळ टर्मिनलचे कामाची पाहणी मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांसमवेत केली. यावेळी ते बोलत होते. रत्नागिरी विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीला मुंबईपासून रत्नागिरी आणि रत्नागिरीपासून मुंबईपर्यंतची परवानगी देण्यात आली असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरीतील नागरिक उद्योगधंद्यांसह शैक्षणिक कामांसाठी मुंबईत जाणार असतील तर त्यांना विमानाने कमी भाड्यात प्रवास करता आला पाहिजे, अशी आमची संकल्पना होती. ते स्वप्न प्रत्यक्षात साकारत असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्योग विभागातून ‘ओडीओपी म्हणजे ‘वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट’ ही जी संकल्पना आहे. केंद्र शासनाकडून त्यातला एक स्टॉल कोकणी उत्पादनाला देण्यात येणार आहे. या ठिकाणच्या कोकणी पदार्थांचा देशभरातील पर्यटकांना आस्वाद घेता येईल. त्यामुळे याची अंमलबजावणीही तत्काळ सुरु होईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.