रत्नागिरी : गेली अनेक वर्षे रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याबाबत वारंवार घोषणा होत होत्या. मात्र, रत्नागिरीचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. जमीन संपादनापासून पुढाकार घेत, राज्य शासनाकडूनही 100 कोटींचा निधी उपलब्ध करुन घेतला. त्यामुळे आता प्रवासी वाहतूक टर्मिनलच्या कामानेही वेग घेतला आहे. वर्षभरात रत्नागिरीकर विमानतळावरुन उड्डाण करण्याची आशा आहे.
पूर्वी रत्नागिरी विमानतळावरुन विमानवाहतूक सुरु होती. मात्र ती बंद झाली. अनेक वर्ष प्रवासी वाहतूक बंद राहिल्यानंतर काही वर्षांपूर्वी हे विमानतळ केंद्र शासनाच्या संरक्षक विभागाने ताब्यात घेत, तटरक्षक दलाच्या हाती सोपवले. याठिकाणी राजकीय पदाधिकारी व विशेष परवानगीने चार्टड विमाने आजही उतरली जात आहेत. याठिकाणी पुन्हा एकदा प्रवासी वाहतूक सुरू व्हावी, यासाठी अनेक राजकीय पदाधिकारी प्रयत्नशील होते.
हे विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात गेल्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी टर्मिनलची आवश्यकता निर्माण झाली होती. अडीच वर्षापूर्वी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या विमानतळावरुन प्रवासी वाहतुकीसाठी गती मिळाली. उद्योगमंत्री आणि पालकमंत्री म्हणून निवड झाल्यावर उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न करण्यास सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी आणण्यात यश आले. त्यामुळे प्रवासी टर्मिनलसाठी जागेचे भूसंपादन करण्यात आले. यातही जमीन मालकांना योग्य भाव देण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया पार पडली. आता खर्या अर्थाने ना. सामंत यांच्या पुढाकाराने प्रवासी टर्मिनलच्या कामाला गर्ती आली आहे.
येत्या वर्षभरात अद्ययावत टर्मिनल उभे राहण्यासाठी कामाला वेग देण्यात आला आहे. शंभर कोटीचा निधी ना. सामंत यांनी मंजूर करुन आणला आहे. या टर्मिनलच्या भोवती जवळपास पावणेतीन कोटी रुपये खर्च करुन, संरक्षक भिंत उभारली जात आहे. याठिकाणी रात्रीचेही विमान उड्डाण होईल, अशी यंत्रणाही बसवण्यात आली आहे.