रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला १०.६७ कोटींचे बळ! File photo
रत्नागिरी

Ratnagiri Airport| रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला १०.६७ कोटींचे बळ!

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या खात्यात निधी वर्ग; ३१ मार्च २०२७ पूर्वी खर्चाचे बंधन, विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मिळणार आर्थिक आधार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरीकरांच्या बहुप्रतीक्षित विमानसेवेच्या स्वप्नाला आर्थिक बळ मिळाले आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) १० कोटी ६७ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. राज्यातील विमानतळ विकासासाठी मंजूर केलेल्या निधीपैकी रत्नागिरीच्या वाट्याला ही रक्कम आली आहे. त्यामुळे विमानतळाच्या विकासकामांना आर्थिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्य शासनाने विमानतळ विकासासाठी एकूण १३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने रत्नागिरीसह शिर्डी, नांदेड, लातूर आणि प्रादेशिक हवाई संपर्क योजनेतील विमानतळांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने एकूण ८५ कोटी १२ लाख रुपये कंपनीकडे वर्ग केले असून, त्यामध्ये रत्नागिरीसाठी १०.६७ कोटी रुपयांचा समावेश आहे.

या निधीचा वापर शासनाने निश्चित केलेल्या कामांसाठीच करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, वितरित निधी ३१ मार्च २०२७ पूर्वी खर्च करण्याची अट घालण्यात आली आहे. निधीच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीआयएमएस प्रणालीद्वारे आर्थिक व्यवहार केले जाणार आहेत.

सुमारे १९७ कोटींच्या प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता

दरम्यान, रत्नागिरी विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी १९७.०५ कोटी रुपयांच्या तृतीय सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यतेला मंजुरी दिली आहे. या आराखड्यात भूसंपादनासाठी ६६.२२ कोटी, प्रवासी टर्मिनल इमारतीसाठी ५५.५६ कोटी, ॲप्रॉन, लिंक टॅक्सी वे आणि जोडरस्त्यांसाठी ३१.६२ कोटी, बीएसएनएल टॉवर स्थलांतरासाठी २.२६ कोटी, सुरक्षा व अतिरिक्त कामांसाठी ५.७५ कोटी आणि अन्य तरतुदींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT