जिल्‍ह्यात खत, बियाण्यांचा मुबलक साठा 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्‍ह्यात खत, बियाण्यांचा मुबलक साठा

खरीप हंगामासाठी ३ रेक खत उपलब्‍ध; ३ हजार ८९० क्विंटल बियाणे उपलब्‍ध

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : खरीप हंगामाची कृषी विभागाच्‍या वतीने नियोजन करण्यात आले आहे. भात, नाचणीसह इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात खत, बियाण्यांची आवश्यकता असते. सध्यातरी जिल्‍ह्यात खते, बियाण्यांचा मुबलकसाठा आहे. मोठ्या प्रमाणात ३ रेक खत उपलब्‍ध झाले आहे तसेच बफर्स स्टॉक करण्यात आला आहे. आतापर्यंत ३ हजार८९० क्विंटल बियाणे उपलब्‍ध झाले असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा विकास कृषी अधिकारी अभिजित गडदे यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.

रत्‍नागिरी जिल्‍ह्यात यंदा ५६ हजार हेक्‍टर क्षेत्रावर भात पेरणीचे उद्दिष्ट आहे. त्‍यासाठी कृषी विभागाच्‍या वतीने नियोजन केले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून खरीप पेरणीसाठी आतापासूनच रोटर, टॅक्‍टर, नांगरणी सुरू झाली आहे. दरम्‍यान, जिल्‍ह्यात खते, बियाण्यांची कमतरता भासू नये अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठकीत दिले आहे.

कृषी विभागाच्‍या वतीने ६५० मे.ट.खताचा बफर्स स्‍टॉक करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ३ रेक खत उपलब्‍ध झाले आहे. युरिया, सुफला, डीएपीसह इतर खते आलेली आहेत. तर ७ हजार ७०० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ हजार ८९० क्विंटल बियाणे उपलब्‍ध झाली आहेत. येत्‍या काही दिवसात आणखी बियाणे येणार आहेत. त्‍यामुळे सध्यातरी जिल्‍ह्यात बियाणे, खतांचा मुबलक साठा असल्‍याचे सांगण्यात आले.

जिल्‍ह्यात खत, बियाण्यांचा साठा आहे. खतांचा बफर्स स्‍टॉक ठेवण्यात आला आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नये. तसेच जिल्‍ह्यात १०० मि.मी. पर्यंत पाऊस पडल्‍याशिवाय पेरणी करू नका. पेरणीसाठी गडबड करू नये, पाऊस चांगला झाल्‍यानंतर पेरणी करावी.
अभिजित गडदे, जिल्‍हा विकास कृषी अधिकारी, जि. प. रत्‍नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT