आचरा : आचरा-पारवाडी-डोंगरेवाडीतील कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे 4 टन कोळंबी मृत झाल्याने सुमारे 18 लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबतची आचरा पोलिस ठाण्यात प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व अंत्तोन फर्नांडिस (रा. धुरीवाडा, मालवण) यांनी तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 13 मे रोजी रात्री 11 ते 12 वा. दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. जिल्हा पोलिस मुख्यालयातून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. या टीमने पाहणी केली असून मृत कोळंबीचे व विषारी पदार्थाचे नमुनघिेतले आहेत. आचरा-डोंगरेवाडी येथे मे. ट्रायटोन मरीनेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा सुमारे 15 एकरात कोळंबी संवर्धन प्रकल्प आहे. यात एक ते सव्वा एकरमध्ये एक असे आठ कृत्रिम तलाव आहेत. पैकी चार तलावामधून कोळंबी उत्पादन सुरू आहे. या तलावांना संपूर्ण जाळीचे कंपाऊंड आहे. तसेच देखरेखीसाठी सहा कामगार आहेत.
जानेवारी-2025 मध्ये कोळंबीची लहान पिल्ले डोंगरेवाडी पारवाडीतील चार तलावामध्ये सोडली होती. मे-2025 पासून येथे कोळंबी उत्पादन सुरू झाले होते. मे च्या पहिल्या आठवडयात सुमारे 400 किलो पूर्ण वाढलेली कोळंबी काढली होती. उर्वरित कोळंबी मे महिन्याच्या अखेरीस काढण्यात येणार होती.
दरम्यान, मंगळवार 13 मे रोजी रात्री 11 वा. प्रकल्पातील एरियेटर कामगाराने बंद केले. रात्री 12 वा.च्या सुमारास ते पुन्हा चालू केले. त्यावेळी पारवाडीच्या दिशेने असलेल्या दोन तलावातील कोळंबी पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. कामागाराने ही माहिती सुपरवायझरला दिली असता सुपरवायझरने तलावाची पाहणी केली. प्रथमदर्शनी ऑक्सिजन कमी झाल्याची शंका आल्याने सुपरवायझरने पाण्याचा पंप चालू केला. परंतु तलावातील कोळंबी मरण्यास सुरुवात झाली. मृत कोळंबी बाहेर काढताना कामगाराला एका तलावात रसायन भरलेली बाटली मिळाली. तसेच तलावाच्या तळाला पिठाचे गोळे दिसले. त्याला रसायनाचा वास येत होता. यावरून 13 मे च्या रात्री 11 ते 12 दरम्यान अज्ञात इसमाने या प्रकल्पाच्या दोन तलावात विषारी पदार्थ टाकल्याची शंका आहे. यामुळे दोन तलावातील मिळून सुमारे 4000 किलो कोळंबी मृत झाली असून अंदाजे 18 लाखांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आचरा पोलिसांनी कोळंबी प्रकल्पाची तत्काळ पाहणी करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी सिंधुदुर्गनगरी येथून फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती. टीमचे कमलेश सोनावणे, तनुजा रावले, आचरा सहा. पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई, बाळू कांबळे, सुशांत पुरळकर, स्वाती आचरेकर तपासात सहभागी झाले होते.