लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात उभ्या असलेल्या कंटेनरला रिक्षाची मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक व चार महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे अविनाश चंद्रकांत शिंदे ( २८, रा. कणगवली शिंदेवाडी, ता. लांजा) असे नाव आहे.
अविनाश शिंदे हा आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ बीसी ३२५६) घेऊन राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथे महिला प्रवाशांना घेण्यासाठी गेला होता. जाताना तो साटवली मार्गे गेला होता. परतीच्या प्रवासात चार महिला प्रवाशांसह तो ओणी मार्गे लांजाच्या दिशेने येत होता. रिक्षा वाकेड घाटात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच ४६ सीयू ०५७८) रिक्षाने मागून जोरदार धडक दिली.