देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी परिसरात गद्रे पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागून गाडी पूर्णतः जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व 30 प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद धोंडीराम साळुंखे (35, रा. लातूर) यांच्या ताब्यातील (एनएल 01 बी 2442) क्रमांकाची खासगी आराम बस पुणे येथून सायंकाळी 6 च्या सुमारास प्रवाशांसह रत्नागिरीकडे निघाली होती.
ही गाडी पहाटे रात्री 3.30 वाजता साखरपा जाधववाडी येथे गद्रे पेट्रोल पंपासमोर पोहोचताच अचानक वाहनातून धूर आणि नंतर ज्वाळा उठताना चालकाच्या निदर्शनास आले.
चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तत्काळ गाडीतून खाली उतरवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.