Ratnagiri Accident 
रत्नागिरी

Ratnagiri Accident | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; चार जखमी तर एका महिलेचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरला कारची जोरदार धडक

पुढारी वृत्तसेवा

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील नातू नगर स्टॉप येथे गुरुवारी दि. १४ रोजी सायंकाळी सुमारे ५.४० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. झायलो कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरला कारची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातग्रस्त झायलो मोटार ( एमएच ०८ झेड ३६९२) ही मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्या लगत उभ्या गॅस कंटेनरवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

या अपघातात अब्दुल अच्चीस जसनाईक (वय ४), सबिया मारूख जसनाईक (वय ३३), सेहरा मारुख जसनाईक (वय ७), इमरान मुरात जसनाईक (वय ४५) हे चार प्रवासी जखमी झाले तर नादिया इमरान जसनाईक (वय २७) यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. जखमी प्रवासी व मृत महिला हे खेड तालुक्यातील भोस्ते गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली अपघात मदतीसाठी तत्पर असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणीज धाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच १०८ ॲम्बुलन्सचे कर्मचारी आणि प्रमोद जाधव यांनीही मदतकार्य केले.

जखमींना तत्काळ भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT