रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील हॉटेल अलंकारच्या अलीकडे मंगळवार 13 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वा. सुमारास भरधाव दुचाकीची समोरुन येणाऱ्या कारला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील प्रतीक संदीप जोशी (वय 24), स्नेहल प्रतीक जोशी (दोन्ही रा. आंजणारी जोशीवाडी लांजा, रत्नागिरी) हे दाम्पत्य जखमी झाले असून दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले असून या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या अपघाताबाबत कार चालक अमोघ उल्हास मुळ्ये (34, मूळ रा. कळझोंडी सध्या रा. सुभाष रोड वरची आळी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण्ा पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी अमोघ मुळ्ये हे आपल्या ताब्यातील होंडा सिटी कार (एमएच-08-एजी-2306) घेउन रत्नागिरी येथून कळझोंडी येथे जात होते. महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने हातखंबा येथील हॉटेल सिध्दाई येथून रत्नागिरी ते हातखंबा जाणारी रस्त्याची एक लेन बंद असल्यामुळे वाहतुक एकाच लेनने सुरु आहे. सकाळी 6.50 वा.सुमारास खबर देणार अमोघ मुळ्ये हे हातखंबा येथील हॉटेल अंलकारच्या अलीकडील रस्त्यावरुन पुढे जात होते. त्याचवेळी प्रतिक जोशी हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-बीएफ-6615) वर पाठीमागे पत्नी स्नेहल जोशी हिला घेउन समोरुन भरधाव वेगाने इतर वाहनांना ओव्हरटेक करुन येत असताना त्याने अमोघ मुळ्ये यांच्या कारला धडक देत अपघात केला.
ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे दुचाकीवरील जोशी दाम्पत्य रत्यावर फेकले गेले. यात प्रतिक जोशीच्या पायाला दुखापत झाली असून पत्नी स्नेहलच्या डोक्याल गंभिर दुखापत झाली. दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारांसाठी स्नेहलला कोल्हापूरला नेण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघाताची पंचनामा केला. या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार भिसे करत आहेत.