रत्नागिरी : मिर्या-नागपूर महामार्गावरील मिर्या-आंबा घाट या 56 कि.मी. च्या टप्प्यातील 44 किलोमीटरचा दोन्ही बाजूंचा भाग पूर्ण झाला असून कामही वेगाने सुरू आहे. या टप्प्यात 92 कोटींच्या नवीन कामांचा समावेश केला आहे. त्यातच कुवारबाव येथील रद्द केलेल्या फ्लायओव्हरचा सुमारे सव्वा कि.मी.चा 200 कोटींचा डीपीआर पुन्हा तयार केला जात असून महामार्गात कोटीच्या कोटी उड्डाणे होऊ लागली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मिर्या-नागपूर महामार्गातील मिर्या ते आंबा घाट या 56 कि.मी.चे काम वेगाने सुरू आहे. यातील 42 कि.मी.चे काँक्रीट रस्त्याचे काम पूर्णत्वाला गेले असून 44 कि.मी.चे दोन्ही बाजूंनी काम झाले आहे. यात काही ठिकाणी डांबरीकरणाचाही समावेश आहे. या कामासाठी मूळ निविदा ही 930 कोटींची होती. त्यामध्ये कुवारबाव येथील फ्लायओव्हरचाही समावेश होता; मात्र नागरिकांच्या विरोधामुळे येथील फ्लायओव्हर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हे काम 867 कोटींवर आले होते. आता कुवारबाव येथील बाजारपेठेतही रुंदीकरण झाले आहे; परंतु कुवारबाव ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनदरम्यान सव्वा कि.मी.च्या पिलरच्या 200 कोटींच्या पुलाचा डिपीआर तयार केला जात असल्याची माहितीही पुढे आली आहे.
या 56 कि.मी.च्या महामार्गातील बदलांसाठी सुमारे 92 कोटींची कामे नव्याने सूचवण्यात आली आहेत. यातही तीन टप्पे करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 45 कोटी 3 लाख 57 हजार रुपयांच्या कामांमध्ये कुवारबाव येथील सर्व्हिस रोड तीन पदरी काँक्रिटीकरण, नाणिज येथे सर्व्हिस रोड, साखरपा येथे अंडरपास या कामांचा समावेश आहे. दुसर्या टप्प्यात 11 कोटी 71 लाखांच्या कामाचा समावेश आहे. या महामार्गावर कारवांचीवाडी, खेडशी शाळा, करंजारी व साखरपा वाणी आळी या ठिकाणी फूट ओव्हरब्रीज टाकण्यात येणार आहेत. 64 ठिकाणी जोडरस्त्यांबाबत प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आला आहे.