Paddy Verity Ratnagiri 8
आतापर्यंत दापोली कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत तयार केलेल्या भाताच्या नवनवीन संशोधनात रत्नागिरी ८ हे वाण शेतकर्यांच्या पसंतीस उतरले आहे. यावर्षी कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी आठ वाणाचे २०० टन बियाणे वितरित केले असून या विक्रीतून विद्यापीठाने २४ लाखांची उलाढाल केली. कोकणातील पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत शेतकर्यांनी या वाणाला पसंती दर्शवली.
त्यामुळे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत या भात वाणाची लोकप्रियता वाढली आहे. कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रत्नागिरी, शिरगाव या भात संशोधन केंद्रात हे वाण विकसित करण्यात आले. १३५ ते १३८ दिवसांत तयार होणारे हे पीक मध्यम बारीक आणि चवीला दर्जेदार आहे.
त्यामुळे दरवर्षी या वाणाची मागणी वाढत आहे. तर महाबीजदेखील कोकण कृषी विद्यापीठातुन या वाणाची उचल करत आहेत. ना नफा ना तोटा या तत्वावर ६० रुपये प्रति किलो दराने विद्यापीठाने या वाणाची विक्री केली आहे.
पाणथळी जमिनीसाठी हे वाण वरदान असून वाणाची कमी उंची असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत नाही. या भाताची गोडी शेतकर्यांना लागली आहे. अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकर्यांचा याचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे.
त्यामुळे कृषी विद्यापीठाने या वाणाच्या उत्पन्न वाढीवर अधिक भर दिला आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडीशा, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांनीदेखील या वाणाला पसंती दिली आहे. बदलत्या हवामानावर टिकून राहणार्या या वाणात रोग प्रतिकारक्षमता अधिक आहे.
रत्नागिरी २४, रत्नागिरी ७११, रत्नागिरी ७१, रत्नागिरी १, रत्नागिरी ५
निमगरव्या (कालावधी १२० ते १२५ दिवस)
रत्नागिरी ४, रत्नागिरी ६, रत्नागिरी ७
गरव्या (महान जात १४० ते १४५ दिवस)
रत्नागिरी ३, रत्नागिरी २, रत्नागिरी ८
उत्पन्न क्षमता अधिक असल्याने कोकणात आणि अन्य राज्यांत या वाणाची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे दरवर्षी रत्नागिरी आठ या वाणाला मागणी वाढत आहे, तर दापोली कोकण कृषी विद्यापीठानेही शेतकर्यांची मागणी लक्षात घेता उत्पन्न वाढीवर भर दिला आहे.अरुण माने, संचालक, मध्यवर्ती संशोधन वाकवली