रत्नागिरीतील ६५ शिक्षकांची स्वगृही बदली 
रत्नागिरी

Ratnagiri News| रत्नागिरीतील ६५ शिक्षकांची स्वगृही बदली; आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा

पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जि. प.त भरती झालेल्या शिक्षकांना संधी

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेत भरती झालेल्या ६५ शिक्षकांना अखेर स्वगृही जाण्याची संधी मिळाली आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून या शिक्षकांची बदली अन्य जिल्ह्यांत करण्यात आली असून जिल्हा परिषद प्रशासनाने त्या बाबतचे आदेश काढले आहेत.

पवित्र पोर्टल ही शिक्षक भरतीसाठी राज्य शासनाची केंद्रीकृत प्रणाली आहे. या पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची भरती झाली होती. गुणवत्ता यादी आणि प्राधान्यक्रमानुसार अनेक शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यापासून दूर कोकणात नियुक्ती मिळाली होती. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतील शिक्षकांना रत्नागिरीत सेवा बजावावी लागत होती. गेल्या तीन ते पाच वर्षांपासून हे शिक्षक रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये सेवा बजावत होते. मूळ जिल्ह्यात जाण्यासाठी या शिक्षकांकडून आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्यात आले होते.

शासनाने पवित्र पोर्टलच्या शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात जाण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ शिक्षकांनी पसंतीच्या जिल्ह्यांमध्ये बदली मिळवली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, या बदलीमुळे शिक्षकांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सेवा कालावधीत खंड पडणार नाही. त्यामुळे त्यांची सेवा ज्येष्ठता, वेतनवाढ, पदोन्नती आणि निवृत्ती लाभांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT