जिल्ह्यात 50 हजारांहून अधिक ‘लाडक्या बहिणी’ झाल्या नावडत्या! Pudhari Photo
रत्नागिरी

Ratnagiri : जिल्ह्यात 50 हजारांहून अधिक ‘लाडक्या बहिणी’ झाल्या नावडत्या!

अटी-शर्तींचा भंग : अर्जांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : महाराष्ट्रातील महिलांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ला रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 24 हजार 440 महिलांनी नोंदणी केली आहे. मात्र, या प्रचंड प्रतिसादासोबतच एक चिंताजनक बाबही समोर आली आहे. जिल्ह्यातील पन्नास हजारांहून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज विविध कारणांनी रद्द झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक महिलांचे जूनचे हप्ते जमा झालेले नाहीत.

जिल्ह्यात एकूण नोंदणी केलेल्या महिलांपैकी तब्बल 50,798 अर्ज विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. अर्ज रद्द होण्यामागे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी करणे, 20 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील महिलांनी अर्ज करणे आदी मुख्य कारणे आहेत. या मोठ्या संख्येमुळे पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. राज्यात या योजनेचा लाभ सदन कुटुंबातील महिलांनीही घेतल्याची माहिती पुढे आली आहे. नोकरीला असणार्‍या, मोठी शेती असणार्‍या व अन्य योजनांचा लाभ घेणार्‍या महिलांनाही आता या योजनेतून वगळण्यात येत असून त्यांचे अर्ज रद्द होत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर यातील 46 हजार 462 अर्ज रद्द करण्यात आले तर वीस वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा अधिक वय असणारे 4 हजार 336 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. अन्य कारणांनीही काही अर्ज रद्द झाले आहेत. यातील अनेक महिलांनी मागील काही महिने या योजनेचा लाभ उचलला आहे. नोंदणी झालेले अर्ज इतक्या मोठ्या संख्येने रद्द झाल्यामुळे अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, रद्द झालेल्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी करण्याची मागणी होत आहे, जेणेकरून या महिलांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी रत्नागिरी तालुक्यात

जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी रत्नागिरी तालुक्यात झाली असून, येथे 54 हजार 137 महिलांनी अर्ज केले आहेत. त्यानंतर चिपळूण तालुक्यात 43 हजार 831 आणि संगमेश्वर तालुक्यात 32 हजार 568 महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर दिसून आला असून, 2 लाख 74 हजार 453 महिलांनी मोबाईल फोनद्वारे, तर 1 लाख 49 हजार 987 महिलांनी पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT