खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नातूनगर-बोरघर सीमेवरील छोट्या पुलाजवळ गेल्या 48 तासांत तब्बल पाच अपघात घडले असून, यामध्ये आठ ते दहाजण जखमी झाले आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी सकाळीच एका तासाच्या आत दोन मोठे अपघात घडले.
पहिल्या घटनेत मुंबईहून सिंधुदुर्गकडे जाणारी मोटार पुलाजवळील खड्ड्यात आदळली. चालकाचे नियंत्रण सुटून गाडी संरक्षक कठड्याला धडकली. या अपघातात आशिषकुमार(45), त्यांची पत्नी अमृता (40), मुलगी अर्शिका ( 10) आणि मुलगा अर्जुन (15) किरकोळ जखमी झाले, तर गाडीचे मोठे नुकसान झाले. दुसर्या घटनेत गोव्याहून मुंबईकडे जाणार कार (एमएच 26 सीपी 2491) अचानक नियंत्रण सुटून पुढे चाललेल्या ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात ट्रॅक्टर चालक संदीप श्रीकांत पाटणे (45, रा. वेरळ) आणि मोटार प्रवासी परेश जाधव (रा. सुकीवली, खेड) गंभीर जखमी झाले. तसेच मोटार चालक महादेव देविदास उजेवाड (22, रा. नांदेड) आणि आणखी सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघातांसह या भागात एकूण पाच अपघातांची नोंद झाली आहे. अपघातांची माहिती मिळताच कशेडी वाहतूक पोलिस शाखेतील उपनिरीक्षक विष्णू गिम्हवणेकर, श्री येवले, पोलिस कर्मचारी सुनील पाटील, तुषार झेंडे, विजय गोलेंवार यांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताची माहिती घेतली. वाहतूक नियमन करण्याचे काम पोलिस कर्मचार्यांनी केली.