रत्नागिरी : जिल्ह्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ अंतर्गत खरीप हंगाम 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेवटचे सहा दिवस असून, जास्तीत जास्त शेतकर्यांनी खरीप पिकाचा पीक विमा काढावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 160 शेतकर्यांनी 44 हेक्टर क्षेत्राकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज केला आहे.
या योजनेत सहभागासाठी अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असून, पीक विमा नुकसानीसाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील 83 महसूल मंडळाकरिता भात व नाचणी पिकांसाठी ही योजना लागू आहे. सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. कुळाने आणि भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी देखील या योजनेत भाग घेऊ शकतात; परंतु त्यांना नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. खरीप हंगामासाठी 2 टक्के, जोखीमस्तर अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के शेतकरी विमा हप्ता आहे.
पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्यांसाठी ही योजना बंधनकारक नाही. त्यांना योजनेत सहभाग घ्यायचा नसल्यास अंतिम दिनांकापासून 7 दिवसांच्या आत बँकेस विमा हप्ता न भरण्याबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. बिगर कर्जदार शेतकर्यांनी आपला सात-बारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा. भरलेली पोहोचपावती जपून ठेवावी. कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आपले सरकारच्या मदतीने या योजनेत सहभाग घेवू शकतात. अधिक माहिती डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.पीएमएफबीआय.गव्ह.इन या पोर्टलवर उपलब्ध आहे.
शेतकर्याने लावलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. योजनेत खरीप हंगामात भात आणि नाचणी ही पिके समाविष्ट आहेत. नियुक्त कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई आहे. विमा हप्त्यामध्ये शेतकरी हिस्सा भातासाठी 457.50 रुपये तर नाचणीसाठी 87.50 रुपये आहे.जास्तीत जास्त शेतकर्यांनी खरीप पिकाचा पीकविमा काढावा.शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी