रत्नागिरी ः जिल्ह्यातील 3 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य तसेच स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान राबवण्यात आली. या मोहीमेत?14 स्थळांतरित मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहे. शोध मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजिटल शाळा, आय. एस. ओ. मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, माध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, नवोदय परीक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे. मात्र शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणेसाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शाळाबाह्य तसेच स्थलांतरित मुलांची शोध मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य, स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला.
या मोहिमेमध्ये शाळाबाह्य एकही मुल सापडले नाही. मात्र स्थलांतरित बालके सापडली आहेत. या सर्व बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यात आले आहे. खेड 5, नगर परिषद हद्द 3, चिपळूण 1, रत्नागिरी 4, राजापूर 1 अशी 14 बालके सापडली आहेत. या सर्व बालकांच्या हाती वही -पेन दिसणार आहे. विशेष म्हणजे कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, नेपाळ यामधून आलेली मुलं सापडली आहेत. या मुलांना दाखल करताना भाषेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यातील अनेक बालकांना मराठी भाषा येत नाही.