रत्नागिरीः दहावी, बारावीचा निकाल लागलेला असून विद्यार्थी,पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. दरम्यान, अकरावीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पध्दतीनेच होणार आहे. ऑफलाइन प्रवेश देता येणार नाही. पोर्टलच्या बाहेर जावून प्रवेश देणाऱ्या संस्थाविरोधात प्रशासकीय किंवा फौजदारी कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 17 हजार 21 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 16 हजार 574 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वांना यंदा प्रवेश मिळणार असून कित्येक जागा रिक्त्त असण्याची शक्यता आहे. दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रीया ऑनलाईनच होणार आहे. नव्या निकषानुसार ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 60, वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 120 विद्यार्थ्यांची तर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 80 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. शहरी भागात माध्यमिक शाळांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 80, वरिष्ठ महाविद्यालयांशा संलग्न संस्थांनासाठी 120 आणि स्वतंत्र महाविद्यालयांसाठी 100 विद्यार्थ्यांची क्षमता मंजूर करण्यात आली आहे.
प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणे किंवा चुकीच्या पद्धतीने प्रवेश क्षमता मिळविण्यावर अंकुश ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रवेश क्षमतेची पडताळणी करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी निर्धारित शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावर विशेष समिती तयार करण्या येणार आहे. देणगी किंवा अतिरिक्त शुल्क वसुली आढळल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे.
महाविद्यालयांची होणार पडताळणी
जिल्ह्यात 141 महाविद्यालयात 25 हजार 870 प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात 16 हजार 574 विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थीपैकी काही विद्यार्थी इतर ठिकाणी प्रवेश घेतात, तर 75 टक्के विद्यार्थी शिल्लक राहणार आहेत. तसेच 120 विद्यार्थ्यांची अतिरिक्त तुकडी मंजूर असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.