रत्नागिरी : लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येवून ठेपले असून सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीस सुरूवात झाली आहे. दरम्यान,गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांना मुंबई, पुणेसह अन्यठिकाणचा सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने परतीच्या प्रवासासाठी 2 हजार 500 एसटी बसेसचे नियोजन केले असून त्याच्या आरक्षणास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 1 हजार एसटी बसेस बुक झाल्या आहेत. ज्यांनी एसटीचे तिकीट काढले नाही त्यांनी ऑनलाईन आरक्षण करावे असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले.
गणेशोत्सवात राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार आहे. नोकरी, व्यवसायनिमित्त मुंबई,पुणे येथे स्थायिक झालेला चाकरमानी गणेशोत्सवात कोकणातील मूळ गावी येत असतो. चाकरमान्यांचा प्रवास चांगला, सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने 5 हजार 200 बसेसचे नियोजन केले असून 22 ते 23 ऑगस्ट दरम्यान मुंबईतून एसटी बसेस कोकणाच्या दिशेने येणार आहेत.
गणेशोत्सव झाल्यानंतर चाकरमान्यांना परतीचा वेध लागत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी परतीच्या प्रवासासाठी 2 हजार 500 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी 22 जुलैपासून ऑनलाईन आरक्षणास सुरुवात केली होती. आतापर्यंत 1 हजार लालपरीचे तिकीट कन्फर्म झाले असल्याचे सांगण्यात आले. आणखीन मोठ्या प्रमाणात एसटी बसेस उपलब्ध असून प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरील वेबसाईट किंवा एमएसआरटीसी या अॅपवर जाऊन तिकीट बुक करण्याचे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी 75 पेक्षा वय असणार्यांना मोफत तर 65 वर्षावरील वयोवृध्द, महिलांसाठी तिकिटात 50 टक्के सवलत असणार आहे. या सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच 150 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करीत असाल तर ऑनलाईन तिकीटावर 15 टक्के सूट सवलतधारक वगळून इतरांना मिळणार आहे.