रत्नागिरी : ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर करण्यात आलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. किल्ल्यावरील शिवसृष्टीनजीकच्या सनसेट पॉईंट येथे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले लोखंडी संरक्षक रेलिंग अवघ्या दोन वर्षांतच गंजून मोडून पडल्याचे समोर आले आहे.
या रेलिंगची अवस्था इतकी खराब झाली आहे की, ते आता अक्षरशः भंगारात काढण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. त्यामुळे या ठिकाणी फिरणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नदुर्ग किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी सनसेन पॉईंटवर पर्यटक मोठ्या संख्येने गद करतात. या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून लोखंडी संरक्षक रेलिंग उभारण्यात आले होते. मात्र समुद्रकिनाऱ्यावरील खाऱ्या व दमट वातावरणाचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे लोखंडाला गंज येणे स्वाभाविक असले तरी अवघ्या दोन वर्षांत संपूर्ण रेलिंग मोडून पडणे हे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. रेलिंगची नियमित देखभाल, रंगकाम आणि गंजप्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने त्याची दुरवस्था अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.
पर्यटनस्थळांवरील सुरक्षेविषयक सुविधा सक्षम असणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र रत्नदुर्ग किल्ल्यावर संरक्षक रेलिंग तुटलेले, विद्युत यंत्रणा जीर्ण अवस्थेत आणि अपूर्ण विकासकामे यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सुविधा अल्पावधीतच निकामी होत असतील, तर त्यामागील कामाचा दर्जा, देखरेख आणि संबंधित कंत्राटदारांच्या जबाबदारीची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. रत्नदुर्ग किल्ला हा जिल्ह्याच्या पर्यटनाचा प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. दरवष हजारो पर्यटक येथे भेट देतात. .
अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या संरक्षक रेलिंगची तातडीने पुनर्बाधणी करणे, निकृष्ट साहित्य वापरणाऱ्यांवर कारवाई करणे, अपूर्ण भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण करणे तसेच जीर्ण डीपी धोकादायक वीजखांब त्वरित बदलणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत, अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे