रामपूर : मार्गताम्हाणे परिसराला गेले तीन दिवस संतत मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. चिपळूण - गुहागर रस्त्यावर रामपूर घाटात दरड कोसळून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. दगड, धोंडे, माती रस्त्यावर आली असून, काही काळ वाहतूक ठप्प झाली. भातशेती पाण्याखाली गेली. शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
रामपूर - गुढे फाटा, काळकाई नगर शिक्षक कॉलनीत पावसाच्या संततधारेमुळे रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी आले होते. नद्या, नाले, पर्यांना पूर आला. मात्र, पावसात महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा कायम सुरळीत ठेवला होता. भूस्खलनानंतर रस्त्यावर माती, मोठे दगड साचल्याने चार चाकी वाहनांना रस्ता ओलांडणे अशक्य झाले होते.
रामपूर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत करण्यासाठी धाव घेतली. मलबा हटवण्याचे काम सुरू झाले. प्रशासकीय यंत्रणेसह स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर काम केल्याने मार्ग मोकळा झाला.