चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन-तीन महिन्यांत आपण उमेदवारी लढवली आणि सतराशे मतांनी आपला पराभव झाला. तसे असताना आपण पक्ष तळागाळापर्यंत वाढवला. अनेक कार्यकर्त्यांना उभे केले. यापुढेही आपण कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नाही. आपण आहे त्याच पक्षात आहोत. आता संघटना मजबूत करणार असून प्रसंगी उमेदवार मिळाला नाही तरी उमेदवारीही लढणार. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते व माजी आमदार रमेश कदम यांनी चिपळुणातील बैठकीत केले.
शहरातील माऊली सभागृहात शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना रमेश कदम पुढे म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्याबरोबर आहे. शेवटी मदतीला रमेश कदमच येणार ही त्यांना खात्री आहे. त्यामुळे किती आले, किती गेले तरी काही फरक पडत नाही किंवा आम्हाला त्याची पर्वा नाही. आपण पवार साहेबांना सांगितले की, ज्यांना आपण उमेदवारी दिली ते आपल्याला सोडून गेले. त्यावेळी पवार साहेबांनी जे गेले ते कावळे, राहिले ते मावळे म्हणून तुम्ही आता कामाला लागा, अशा शब्दात आपल्याला सांगितले. मात्र आपल्याला एकच वाईट वाटते की, ज्यावेळी पक्षाचे विभाजन झाले त्यावेळी ज्या लोकांना शरद पवार साहेबांनी मोठे केले ते सर्व त्यांना सोडून गेले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पवार साहेबांनी आपल्याला लढ म्हणून सांगितले होते. मात्र आपण त्यांना नवीन कार्यकर्त्याला संधी द्यावी म्हणजे भविष्यात तो मजबुतीने पक्ष वाढवेल असे सांगितले आणि जे गेले त्यांना उमेदवारी मिळवून दिली. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना न सांगताच, विश्वासात न घेताच दुसरीकडे गेले. आपण असे करणार नाही. जर कुठे जायचे असेल तर आधी कार्यकर्त्यांना सांगेन किंबहुना त्यांना घेऊनच जाईन, परंतु आपण आहोत तिथेच आहोत. येणार्या निवडणुकीत आघाडी झाली तर आघाडीबरोबर आणि नाहि झाली तर स्वबळाची तयारी ठेवा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला .
यावेळी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, प्रांतिक सेल उपाध्यक्ष एम बंदूकवाले, डॉ. संतोष दाभोळकर, कार्याध्यक्ष शिरीष काटकर, महिला तालुकाध्यक्षा राधा शिंदे, शराध्यक्षा रेहमत जबले, शहराध्यक्ष रतन पवार, युवक तालुका अध्यक्ष रोहन नलावडे, शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, अप्पा खेडेकर, नंदू शिर्के, माजी उपसभापती वासुदेव मेस्त्री, सुतार समाज जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, सेल जिल्हाध्यक्ष रईस अल्वी, हिंदुराव पवार, दीपक महाडिक,मुन्ना जसनाईक, संजय तांबडे, रिहान गडकरी, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, सावित्री होमकळस आदी उपस्थित होते.