खेड : उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, त्यांना बजेट काय समजणार?, असा टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. खेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना कदम यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
बजेटच्या मुद्द्यावरून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी किती निधी दिला? हे ते सांगू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? उद्धव ठाकरेंना आता टीका करण्याचेच काम आहे. ते भविष्यात कधीच सत्तेत येणार नाहीत. केलेल्या कर्माची फळं उद्धव ठाकरेंना भोगावी लागतील.बजेट हे पक्षाचे नसते, असे रामदास कदम म्हणाले. टीका करण्याचा उद्धव ठाकरेंचा धंदा सुरु राहू देत. लाडकी बहीण योजनेबाबत रामदास कदम यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. बजेट डोळ्यासमोर ठेऊन योजना राबवाव्या लागतात. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसर्या योजना सुरू करता येतील, असेही कदम म्हणाले. अंथरुण पाहून पाय पसरावे लागतात, असेही रामदास कदम म्हणाले.
भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचे रामदास कदम म्हणाले. कर्नाटकमध्ये जाऊन तुम्ही मराठी किंवा हिंदी भाषेत बोलून दाखवा असंही ते म्हणाले. तिथे बोलता येत नसेल तर मुंबईत इतर भाषा का? असा खडा सवाल रामदास कदम यांनी केला.