अनुज जोशी
खेड : मुंबईत शनिवारी एक राजकीयदृष्ट्या महत्वाची भेट पार पडली. कोकणातील प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. आप्पा कदम हे उद्योजक असून शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे सख्खे धाकटे भाऊ आहेत. ते ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांना भेटल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कोकणात आधुनिक शेतीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आप्पा कदम यांनी आपल्या सुपुत्र अनिकेत कदम आणि मित्रपरिवारासह उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी उद्योजक नितीन केणी, शंकर नायर, मंगेश कदम, रामदास मुरकुटे, किशोर शिर्के आणि अशोक शिंदे हे देखील उपस्थित होते.
सध्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेसोबत असलेले नेते रामदास कदम यांच्या भावाने उद्धव ठाकरे यांची घेतलेली सदिच्छा भेट केवळ सौजन्यभेट नसून, राजकीय हालचालींना नवे वळण देणारी ठरू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
आप्पा कदम हे ठाकरे यांना कोकणात नेहमीच भक्कम पाठबळ देत आले आहेत. गत विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारात देखील त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. मात्र संजय कदम यांनी काही महिन्यांपूर्वी थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर सदानंद कदम यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. “कोकणातल्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होणार का? हा प्रश्न सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.”